मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत समाजमाध्यमावर बदनामीकारक पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला २१ गुन्ह्यांत अटक करणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायलयाने सोमवारी दिले.
केतकीवर राज्यातील विविध जिल्ह्यांतून २२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कळवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी केटकीला १४ मे रोजी अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात ठाणे सत्र न्यायालयाने केतकीची जामिनावर सुटका केली.
गेल्या आठवड्यातच केतकीने तिच्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांना उच्च न्यायालयात आव्हान दिले. सोमवारी न्या. नितीन जामदार व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे केतकीच्या याचिकेवरील सुनावणी होती. केतकीला उर्वरित २१ गुन्ह्यांत अटक करण्यात येणार नाही, अशी हमी राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील अरुणा पै-कामत यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने त्यांची हमी स्वीकारत याचिकेवरील सुनावणी १२ जुलैपर्यंत तहकूब केली.