कोलकत्ता दि.१ (वृत्तसंस्था)-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने क्रिकेटमध्ये ३० वर्षे पूर्ण केली आहेत. स्वत: सौरव गांगुलीने बुधवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. तो आयुष्यामध्ये नवीन गोष्टीची सुरुवात करणार आहे. त्यासाठी चाहत्यांच्या समर्थनाची आवश्यकता, असे ट्विट त्याने केले आहे. त्याच्या या ट्विटमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा देणार का? तो राजकारणात प्रवेश करणार का? असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होते आहेत. याशिवाय, त्याला राष्ट्रपती नियुक्त खासदारकी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहेत.
मे महिन्यात सहा तारखेला गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीची भेट घेतली होती. शाह यांनी गांगुलीच्या कोलकाता येथील निवासस्थानी जाऊन रात्रीचे जेवण केले होते. दोघांच्या भेटीनंतर गांगुली भारतीय जनता पक्षात (भाजपा) सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर, आता गांगुलीने केलेल्या ट्विटमुळे पुन्हा या शक्यतांना हवा मिळाली आहे.
बातमी शेअर करा