एकामागोमाग एक हत्येच्या घटनांमुळे औरंगाबाद शहर हादरले आहे. आजदेखील शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45), असे या दाम्पत्याचे नाव आहे.
दोन दिवसांहून अधिक वेळ दोघांचे मृतदेह घरात पडून होते. त्यामुळे आज परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घराचा तपास केला असता घरातील खालच्या मजल्यावर एक आणि वरच्या मजल्यावर एक असे दोन मृतदेह पोलिसांना आढळले. हे मृतदेहदेखील कुजलेल्या अवस्थेत होते.
मुलावर हत्येचा संशय
मृत शामसुंदर कळंत्री यांची किरण कळंत्री ही तिसरी पत्नी होती. गजानगरमध्ये हे दाम्पत्य आपल्या मुलगा आकाश व मुलगी वैष्णवीसोबत राहत होते. आकाश हा शामसुंदर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. तर, वैष्णवी ही तिसरी पत्नी व मयत किरण कळंत्री यांची मुलगी आहे. मुलीने दिलेल्या माहितीनूसार, शनिवारी शामसुंदर यांनी तिला एसबी कॉजेलमध्ये सोडले होते. नंतर दुपारी वडिलांनी तिला फोन केला होता. आपण गावी जाणार असल्याने काकांच्या घरी जा, असे तिला वडिलांनी सांगितले. त्यामुळे आपण कॉलेजनंतर काकांच्या घरी गेलो, असे मुलीने सांगितले आहे. मात्र, या घटनेनंतर शामसुंदर यांचा मुलगा आकाश कळंत्री फरार झाला होता. तसेच, मुलीला त्यानेच वडीलांच्या नावाने फोन केल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यानेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
काही तासांतच संशयित ताब्यात
हत्येनंतर तपासाची वेगाने चक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयिताला शिर्डी येथून ताब्यात घेतले आहे. पोलिस संशयित मुलाची चौकशी करत आहे. हत्येनंतर तो फरार का झाला? त्यानेच हत्या केली का? केली असेल तर कोणत्या कारणामुळे त्याने हत्या केली? हे सर्व आता चौकशीत समोर येणार आहे.
उपायुक्त दिपक हिरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल ढुमे, पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांच्यासह फॉरेन्सिक टीम व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.