Advertisement

आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

प्रजापत्र | Sunday, 22/05/2022
बातमी शेअर करा

मुंबई दि.२२ (प्रतिनिधी)-आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी (दि.२२) निवड करण्यात आली. रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत आफ्रिकेचा सामना करणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हार्दिक पांड्याचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. आयपीएल २०२२त आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या दिनेश कार्तिक आणि उमरान मलिकने आपली निवड करण्यास भाग पाडले. 

 

 

        तसेच यावेळी कुलदीप यादव, अर्षदीप सिंग यांनीही आयपीएल २०२२तील कामगिरीच्या जोरावर संघात स्थान पटकावले. पण, बीसीसीआयच्या या निवडीवरून नेटिझन्स खवळले आहेत. ऋतुराज गायकवाड, इशान किशन, वेंकटेश अय्यर या फ्लॉफ ठरलेल्या खेळाडूंना संधी दिली गेली, तर राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन आणि शिखर धवन यांच्यावर अन्याय झाल्याची भावना नेटिझन्स व्यक्त करत आहेत. राहुलने १३ सामन्यांत १६१.७२च्या स्ट्राईक रेटने ३९३ धावा केल्या आहेत, संजूनेही १४ सामन्यांत १४७.२४च्या स्ट्राईक रेटने ३७४ धावा केल्या आहेत. शिखर १३ सामन्यांत ४२१ धावा करून आयपीएल २०२२त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत सहाव्या क्रमांकावर आहे. मात्र निवड समितीने निवड केलेल्या खेळाडूंवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 
दरम्यान येत्या ९ जून ते १९ जून या कालावधित भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. तसेच येत्या 1 ते 5 जुलै दरम्यान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरोधात कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

Advertisement

Advertisement