सिडनी-ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि दिग्गज क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्स याचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजता ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविले येथे कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, क्वीन्सलँड शहराच्या पश्चिमेला सुमारे 50 किलोमीटर अंतरावर एक भरधाव कार रस्त्यावर उलटली. याच कारमध्ये अँड्रयू सायमंड्सदेखील होता.
एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यावेळी सायमंड्स कारमध्ये एकटाच होता. अपघातामुळे सायमंड्सला गंभीर दुखापती झाल्या. घटनेनंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले.
क्रिकेटविश्वात शोक
46 वर्षीय अँड्र्यू सायमंड्सच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ॲडम गिलख्रिस्टने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे. हे अत्यंत वेदनादायक असल्याचे त्याने म्हटले आहे. तर, संपूर्ण क्रिकेट विश्वासाठीच हा दुःखाचा दिवस आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटले आहे. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, 'आमचे मैदानावर आणि त्यापलीकडेही सुंदर नाते होते. आम्ही त्याच्या कुटुंबीयांसोबत आहोत.'