बीड दि.१४ (प्रतिनिधी)-शासनाने जून २०२१ पासून घरबसल्या लर्निंग लायसन नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले आहे.यासाठी शासकीय पावती केवळ ३०० रुपयांची असून हे लायसन्स काढून देण्यासाठी अनेक ठिकाणी वाहन चालकांची लूट होत असल्याचे समोर येत आहे.असाच एक प्रकार औरंगाबादमध्ये घडला असून मोटार वाहन निरीक्षकालाच बोगस लायसन्स काढून दिल्याने बीडच्या आरटीओ विभागाने कारवाई केली आहे.
आता ऑनलाईन लायसन्स मिळू लागल्याने आरटीओ कार्यालयात भेट देण्याची कोणतीही आवश्यकता नागरिकांना उरली नाही. सदर शासकीय योजनेचा उद्देश लोकांना कोणताही त्रास न होता घरी बसून लायसन्स मिळावे हा होता.या योजनेचा सर्वात जास्त गैरवापर ड्रायव्हिंग स्कूल चालक, एजंट व सेतू सुविधा केंद्र चालविणाऱ्यांनी घेऊन मनमानी पद्धतीने लोकांकडून अव्वाचे सव्वा पैसे आरटीओच्या नावाने वसूल करत आहेत. सदरचा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात सुरू असून याबाबत परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी सदर बोगस पणे लर्निंग लायसन्स वाटप करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जारी केले.यानुषंगाने अधिकारी औरंगाबाद यांनी बीड आरटीओ कार्यालयातील निरीक्षक श्री गणेश विघ्ने यांना औरंगाबाद येथे तपासणी करता आदेशित केली असता, किरण दळवी यांच्या श्री गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल, जळगाव रोड औरंगाबाद, येथील स्कूलवर बोगस लर्निंग लायसन्स करत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत स्वतः मोटार वाहन निरीक्षक श्री गणेश विघ्ने यांनी वेषांतर करून सदर स्कूल ला भेट दिली असता किरण दळवी यांनी अर्जदार हा शिकाऊ अनुजप्ती चाचणीस प्रत्यक्षात उपस्थित आहे किंवा नाही, कागदपत्रे काय दिलीत हे काहीही न तपासता ज्या कामाची शासकीय पावती फक्त ३०० रु आहे त्याचे २००० रू घेऊन विनाउमेदवार शिकाऊ लायसन्स जारी केले. दरम्यान याप्रकरणी गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक किरण दळवी यांच्यावर शासनाची फसवणूक केले बाबत सिडको शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.