मुंबई दि.२८ (प्रतिनिधी)-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांच्या भाग भांडवलात आज राज्य मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत मोठी वाढ करण्यात आली असून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास मोठे यश आले आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा पूर्वी 500 कोटी होती, ती वाढवून 1000 कोटी करण्यात आली आहे. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा 300 कोटींवरून 1000 कोटी करण्यात आली आहे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची मर्यादा पूर्वी 73.21 कोटी कोटी, ती देखील वाढवून 1000 कोटी करण्यात आली; तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा 50 कोटींवरून 500 कोटी करण्यात आली आहे.
या चारही महामंडळांचे भागभांडवल मोठ्या प्रमाणात वाढवल्याने अनुसूचित जातीतील घटकांसह या महामंडळांच्या लाभार्थी घटकांना कर्ज वाटप, रोजगार व स्वयं रोजगारांच्या वाढीव संधी, दीर्घ मुदत कर्ज योजना, कैशल्य विकासाच्या विविध योजना राबविण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठा हातभार लागणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
या चारही महामंडळाचे भागभांडवल वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून या निर्णयाबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.