Advertisement

सगळेच माझ्यासारखे नसतात-शरद पवार

प्रजापत्र | Monday, 25/04/2022
बातमी शेअर करा

पुणे-सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. निवडणुकांपूर्वीच काही लोकांनी 'मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार', अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळेच ते सध्या अस्वस्थ होत असतील, तर मी त्यांना दोष देणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चिमटा काढला. ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
    यावेळी शरद पवार यांना भाजप नेत्यांच्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. माझी सत्ता कैकदा गेली आहे. १९८० साली माझे सरकार बरखास्त झाले. रात्री साडेबारा वाजता मुख्य सचिवांनी मला ही बातमी दिली. त्यानंतर मी तीन-चार लोकांना बोलावून घरातील सामान आवरले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. सरकारची गादी सोडली. त्यादिवशी मुंबईत इंग्लंड आणि भारत यांची क्रिकेट मॅच होती. ती मॅच पाहण्यासाठी मी सकाळी १० वाजता वानखेडे स्टेडिअमवर गेलो आणि दिवसभर मॅच पाहण्याचा आनंद लुटला. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे आपण इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

 

हनुमान चालिसा वादावर काय म्हणाले पवार?
प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको, असं शरद पवारांनी म्हटलं. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्वावरून तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सर्वांनी निर्णय घेऊन सामोपचारानं प्रश्न निकाली निघाल्यास उत्तमच होईल, असं पवार पुढे म्हणाले.
 

Advertisement

Advertisement