नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार (Nanded Crime) करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. दिवसाढवळ्या नांदेडमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं (Firing) कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्यावर गोळी झाडून कोणी हल्ला केला, हे अजूनही समजलेलं नाही. बियाणींच्या हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदाने खंडणीसाठी धमकी दिली होती, मात्र तेव्हा पुरवलेली सुरक्षा काही दिवसांपूर्वीच कमी करण्यात आली होती.