Advertisement

मंत्रिमंडळात होणार फेरबदल?

प्रजापत्र | Monday, 04/04/2022
बातमी शेअर करा

मुंबई – गेल्या काही महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडीत धुसफूस असल्याचं समोर येत होते. गृहमंत्र्यांच्या कारभारावर शिवसेना नाराज असल्याचंही बोललं जात होते. तर विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनातही झाला नाही त्यामुळे काँग्रेसही नाराज आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच महिन्यात मंत्रिमंडळात फेरबदल होतील अशी सूत्रांची माहिती आहे.

 

येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि काँग्रेसचे नेते यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यात महाविकास आघाडीतील काही खातेबदल होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गृहखाते शिवसेनेने घ्यावं अशी मागणी सेना नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. त्यामुळे गृहखात्याची अदला-बदल होणार का? हे पाहणं गरजेचे आहे.

 

८ एप्रिलला राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित असतील. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. मागील २ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदावरही तोडगा निघण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे भास्कर जाधव हे सभागृह चांगल्या प्रकारे चालवू शकतात असं काहींचे म्हणणं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे घेऊन त्याबदल्यात एखादं मंत्रिपद काँग्रेसला देता येईल का यावरही बैठकीत चाचपणी केली जाईल.

 

अलीकडेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे वृत्त फेटाळून लावले. मात्र गृह खाते मुख्यमंत्र्यांनी घ्यावं अशी मागणी शिवसेना नेते करत आहेत. त्यातच निधी वाटपावरूनही महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. शिवसेना, काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे मध्यंतरी २५ आमदार नाराज असून ते अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत होते. त्यामुळे या सर्व विसंवादाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement