अंबाजोगाई (प्रतिनिधी)-येथील तरुण कार्यकर्ते विपुल राजेंद्र कुलकर्णी यांचे आज दुपारी आकस्मिक निधन झाले.
विपुल कुलकर्णी हा तरुण आपल्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील कामात कार्यरत होता. अलिकडेच झालेल्या किसान पुत्र आंदोलनाच्या पानगाव ते अंबाजोगाई या पदयात्रेत त्याने सहभाग घेतला होता. आज सकाळपासून अत्यंत चांगल्या मुड मध्ये असलेला विपुल सकाळच्या जेवणानंतर नागझरी परीसरातील कुंडाकडे भ्रमंती साठी गेला होता. याच परिसरातील एका कुंडात तो पाय घसरुन पडला. पोहता येत नसल्यामुळे आणि जवळपास कोणी नसल्यामुळे तो या कुंडातील पाण्यात बुडाला. याच परिसरातील एका शेळ्या चारणा-या व्यक्तीने ही माहिती दिली, त्यावरुन त्याचा शोध घेतला असता तो या कुंडात आढळुन आला.
विपुल हा दिवंगत स्वातंत्र्य सैनिक तथा ज्येष्ठ कवी कॉ. राम मुकुद्दम यांचा नातु तर आरोग्य विभागातील सेवानिवृत्त वरीष्ठ लिपीक राजेंद्र कुलकर्णी आणि गोदावरी कुंकुलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयातील संगीत शिक्षिका सौ. संगीता राजेंद्र कुलकर्णी यांचा ज्येष्ठ मुलगा होता. विपुल यांच्या आकस्मिक निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सायंकाळी येथील बोरुळा तलाव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.