Advertisement

काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा, हीच माझी इच्छा

प्रजापत्र | Monday, 28/03/2022
बातमी शेअर करा

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी काँग्रेसबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलंय. एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, “लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणे आवश्यक आहे. सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली इच्छा आहे. काँग्रेस पक्ष कमकुवत होत असून देशातील मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत, हे चांगले लक्षण नाही,” असं मत गडकरी यांनी व्यक्त केलंय.

 

 

लोकमतच्या एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, ‘लोकशाही दोन चाकांवर चालते- सत्ताधारी आणि विरोधक. प्रबळ विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी अशी माझी इच्छा आहे. त्याचवेळी काँग्रेस कमकुवत असताना त्याचे स्थान प्रादेशिक पक्ष घेत आहेत, जे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची जागा घेण्यासाठी मजबूत झाला पाहिजे,’ अशी इच्छा गडकरींनी बोलून दाखवली.

 

 

पराभवानंतर निराश होऊ नका आणि पक्षासोबत राहण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस नेत्यांना केले. ते म्हणाले की, ‘काँग्रेस मजबूत राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. जे काँग्रेसच्या विचारसरणीचे पालन करतात, त्यांनी पक्षासोबत राहून खंबीर राहावे. पराभवाने खचून न जाता त्यांनी काम करत राहावे. पराभव झाला तर एक दिवस विजयही होणारच. यावेळी त्यांनी भाजपाला संसदेत फक्त २ जागा जिंकता आल्याची आठवणही सांगितली. “पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काळ बदलला आणि अटलबिहारी वाजपेयींच्या रूपाने आम्हाला पंतप्रधान मिळाला. अशा परिस्थितीत निराश होऊन आपली विचारधारा सोडू नये,” असं आवाहन गडकरींनी काँग्रेस नेत्यांना केलं.
 

Advertisement

Advertisement