द कुटे ग्रुप - तिरुमला ऑईल
अर्चना कुटे. मुळ ग्रामीण भागातल्या. लग्नानंतर कुटे उद्योग समूहात व्यवसाय सांभाळण्याची संधी मिळाली आणि ग्रामीण भागातून आलेल्या या महिलेने पाहता पाहता औद्यागिक जगतात स्वत:ची छाप पाडली. तिरूमला ऑईल या आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवलेल्या व्यवसायाची एमडी म्हणून काम पाहतांना त्यांना कधी स्वत:चं मुळ ग्रामीण असणं आडवं आलं नाही. किंवा उद्योगजगतात यशस्वी उद्योजिका म्हणून वावरताना मोठेपणाचा वाराही लागला नाही. बीड सारख्या जिल्ह्यातील एक महिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्रॅड असलेल्या उद्योगसमूहाला चालवू शकते हा विश्वास अर्चना कुटेंनी मिळवून दिला आहे. त्या स्वत: तर उद्योगजगतात पुढे आल्याच पण आपल्यासोबतच तिरूमला उद्योगसमूहात ग्रामीण भागातील अनेक महिलांना सहभागी करून घेण्यात त्यांना यश मिळालं. ग्रामीण भागातील महिलांना आपण उभं करू शकलो याचं समाधान आहे या शब्दात त्या आपल्या प्रवासावर भाष्य करतात.
प्रश्न-तिरुमला ऑईल हे नाव आज सर्वश्रूत आहे, आपण उद्योगक्षेत्राकडे कशा वळलात?
अर्चना कुटे : माझं मुळ कुटूंबं शेतकरी पण लग्नानंतर मी कुटे झाले. कुटे कुटूंबाचा-सुरेश कुटे यांचा-व्यवसायावर भर असायचा. हे कुटूंब सातत्याने वेगवेगळ्या व्यवसायात अग्रेसर असलेले. त्यामुळेच कुटूंबातच उद्योजकतेचे वातावरण कायम होते. मी जेव्हा लग्न होवून इकडे आले त्यावेळी साहजिकच त्या वातावरणाचा परिणाम झाला. माझे पती सुरेश कुटे यांनी सुरूवातीपासूनच मी कुटे ग्रुपच्या व्यवसायामध्ये लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यासाठी पूर्ण सहकार्यदेखील केले, त्यामुळेच मी या उद्योगसमूहात सक्रीय होवू शकले.
प्रश्न- आपली मुळ कौटूंबीकपार्श्वभूमी काय होती?
अर्चना कुटे : लग्नापूर्वी मी एका शेतकरी कुटूंबातली. मला दोन भाऊ, तीन बहिणी. बीडमध्येच एम.कॉम पर्यंत शिक्षण घेतलं होतं.
प्रश्न- मग उद्योगक्षेत्राची माहितीकशी झाली?
अर्चना कुटे : मघाशीच सांगितल्याप्रमाणे मी कुटे समूहात सक्रीय व्हावं अशी सुरेश कुटे यांची इच्छा होती. त्यामुळे मग मी एम.बी.ए. केलं. फायनान्समध्ये एमबीए केल्यानंतर मी या उद्योगसमूहात लक्ष द्यायला सुरूवात केली. वेळोवेळी सुरेश कुटे सरांचं मार्गदर्शन आणि पाठींबा असायचाच. माझ्यातही एक जिद्द निर्माण झाली होती. त्यातूनच मग हे सगळं होत गेलं.
प्रश्न- आपल्या भागाला कॉपोरेट कल्चर नवीन आहे. ते कसं आत्मसात केलं?
अर्चना कुटे : खरं तर कॉपोरेट कल्चरमध्ये वावरणं हे आव्हान होतंच. पण एखादं नवीन काम करण्याची जिद्द असेल तर काहीही करता येतं. हा आत्मविश्वास होता. त्याला जोडूनच मला संपूर्ण कुटे कुटूंबानं सहकार्य केलं. बळ दिलं आणि म्हणूनच आम्हाला हे करता आलं. खरं तर मी एकटीनंच नव्हे तर माझ्यासोबत कुटे उद्योगसमूहात अनेक महिलांना आम्ही कॉपोरेट कल्चर शिकवलं. आज दीडशे ते दोनशे महिला संगणक हाताळतात, इंग्रजी बोलतात, कॉपोरेट कल्चरला सामोर्या जातात. या सार्या महिला अर्थातच ग्रामीण भागातून आलेल्या आहेत. पण त्यांनी हे सर्व आत्मसात केलं. त्यांना उभं करता आलं याचं समाधान आहे.
प्रश्न- एक महिला म्हणून कधीअडचण आली का?
अर्चना कुटे : महिला म्हणून कधी काही अहचण वाटली नाही. मुळात कुटे उद्योग समूहात आम्ही एक कुटुंब म्हणूनच काम करतो. आम्ही आमच्याकडे कर्मचारी नाही तर कुटुंबातील सदस्य म्हणून सर्वांकडे पाहतो, त्यामुळे देखील या उद्योगसमूहाचं एक वेगळं वातावरण आहे. म्हणून या क्षेत्रात काम करताना कधी फारशा अडचणी आल्या नाहीत.
प्रश्न- या यशामध्ये कोणत्या गोष्टींचा सहभाग आहे असं वाटतं?
अर्चना कुटे : खरं तर पती सुरेश कुटे आणि संपूर्ण कुटे कुटूंबानंच, माझ्या सासू सासर्यांनी जी मदत केली, जे सहकार्य केलं त्यामुळेच हे होवू शकलं. त्यासोबतच बीडच्या नागरीकांनी बीडमधील माध्यमांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं. प्रत्येक टप्प्यावर बळ दिलं त्यातूनच हे घडत गेलं. याच्या जोडीला आमची स्वत:ची कठोर मेहनत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
प्रश्न- या सर्व प्रवासात काही त्याग करावा लागला का?
अर्चना कुटे : एका महिलेला उद्योगजगतात काम करायचं असेल तर कुटुंब आणि व्यवसाय या दोन्हीकडे लक्ष द्यावे लागते. कुटे समूहात काम करताना साहजिकच कुटुंबाला पुरेसा वेळ अनेकदा देता येत नाही. तो त्याग करावाच लागतो परंतू कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हे समजून घेतलं.
प्रश्न - या प्रवासातला समाधानाचा क्षण कोणता?
अर्चना कुटे : कुटे उद्योग समूहाला अनेक पुरस्कार मिळाले. दुबईत जावून आम्हाला पुरस्कार घेता आला. कुटे उद्योगसमूह आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचलं आहे. या सार्याच गोष्टी समाधानाच्या आहेत. त्यासोबतच माझा मुलगा आर्यन जो 10 वर्षांचा आहे पण आमच्या घरातील उद्योगाचं वातावरण त्यानं सुद्धा इतकं आत्मसात केलं की त्यानं वयाच्या दहाव्या वर्षी स्वत:ची कंपनी स्थापन केली. आपल्या मुलानं केलेली ही प्रगती सर्वांधिक समाधान देणारी, अभिमानाची आहे.
प्रश्न-भविष्यातील संकल्पना काय आहेत?
अर्चना कुटे : कुटे ग्रुपचं मुख्यालय बीडला आहे. बीडच्या मातीतून हा उद्योगसमूह उभा राहिला. आज देशातील अनेक भागात आमची कॉर्पोरेट कार्यालये आहेत. कुटे उद्योगसमूह वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय. तिरुमला ऑईल यासोबतच जिनिंग प्रेसिंग, डेरी या वेगवेगळ्या क्षेत्रात हा उद्योगसमूह आहे. एक कुटूंब म्हणून आम्ही काम करतो. जमेल तितक्या लोकांना उभं करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या हातून जास्तीत जास्त कुटूंबं उभी राहावीत आणि कुटे समूह आणखी आंतरराष्ट्रीय ख्यातीला पोहचावा हिच संकल्पना आहे.