Advertisement

​​​​​​​संभाजीराजेंची तब्येत बिघडली

प्रजापत्र | Monday, 28/02/2022
बातमी शेअर करा

 

मुंबई-मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी राजे हे आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. मात्र उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजेंची तब्येत बिघडली आहे. त्यांना उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास नकार दिला आहे.

 

मराठा आरक्षणासाठी लढा लढणाऱ्या संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. डॉक्टर दिवसातून तीन वेळेस त्यांची तपासणी करत आहेत. सकाळी तपासणी केल्यानंतरही डॉक्टरांना राजेंच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. तसेच रक्तदाब देखील कमी झाला आहे. त्यांना अशक्तपणा आणि तीव्र डोकेदुखीची लक्षणे जाणवत आहेत. यावर डॉक्टरांनी राजे यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. मात्र, राजेंनी त्यालाही नकार दिला आहे.

 

दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी आझाद मैदानावर जाऊन संभाजीराजेंची भेट घेतली होती. त्या वेळी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, सरकारकडून लेखी निर्णय आणि भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली होती.

Advertisement

Advertisement