राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज(शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उप निरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्याचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई, हवालदार आणि सहायक पोलीस उप निरीक्षक यांना होईल. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा कालावधीत पदोन्नतीच्या तीन संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल.
या शिवाय पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उप निरीक्षक या पदोन्नती साखळीमधील पोलीस नाईक या संवर्गातील ३८ हजार १६९ पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलीस शिपाई, पोलीस हवालदार व सहायक पोलीस उप निरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे. यामुळे आता पुनर्रचनेनंतर पोलीस शिपायांची पदे १ लाख ८ हजार ५८, पोलीस हवालदारांची पदे ५१ हजार २१०, सहायक पोलीस उप निरीक्षकांची पदे १७ हजार ७१ इतकी वाढतील.
या निर्णयामुळे पोलीस दलातील पोलीस हवालदार व सहायक पोलीस उप निरीक्षक या संवर्गातील पदांच्या वाढीमुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत भरीव वाढ होणार असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल.
त्याचबरोबर पोलीस दलात किमान ३० वर्षे सेवा पूर्ण झालेले आणि सहायक पोलीस उप निरीक्षक या पदावर ३ वर्षे सेवा पूर्ण झालेले त्याचप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उप निरीक्षकांचे वेतन घेत असलेले अशा तीन निकषांची पूर्तता करणाऱ्या अंमलदारांना श्रेणी पोलीस उप निरीक्षक (ग्रेड पी.एस.आय.) असे संबोधण्यात येईल. या अधिकाऱ्यांना नाशिक येथे १२ आठवड्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये घ्यावे लागेल.