परंडा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवकांचे आशास्थान आमदार रोहित पवार दि. २१ रोजी परंडा येथे आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. कार्यक्रमानंतर ते शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात व भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीनंतर माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांची नाराजी उफाळून आली असल्याने परंडा शहरातील राजकारण ढवळुन निघाले आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सौदागर समर्थकांत प्रचंड नाराजी उसळली आहे. सोशल मीडियावर नाराजीचे पोस्ट कार्यकर्ते उघडपणे टाकीत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला याचा तोटा सहन करावा लागणार आहे. नाराजी दुर करण्यात माजी आमदार राहुल मोटे यांना यश येणार का? अशी शहरात चर्चा सुरू आहे.
परंडा येथील आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना निमंत्रण नव्हते. त्यामुळे त्यांचे समर्थक प्रचंड नाराज असल्याचे दिसुन येत आहे. समर्थकांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्या कानावर ही बाब घातली आणि या कार्यक्रमासाठी रोहीत पवार यांनी येऊ नयेत, असे माजी आमदार राहूल मोटे यांच्यामार्फत प्रयत्न केले, मात्र ते निष्फळ ठरले. मात्र स्थानिक लोकप्रतिधींच्या इच्छा डावलुन आमदार रोहित पवार, राहुल मोटे कार्यक्रमास आले आणि नगर परिषदेच्या तोंडावर विरोधकांच्या दारी गेले. त्यामुळे परंड्यातील रॉष्ट्रवादी कार्यकर्त्यांत प्रंचड नाराजी पसरली आहे. शहरासह तालुक्यात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर कोणता निर्णय घेतात याच्या चर्चेला उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी पक्षाची नगर परिषदेतील सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजप, काँग्रेसचे सहकार्य घेणार असल्याचे सांगितले होते. तरी देखील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व माजी आमदार राहुल मोटे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात गेल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. याचा पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सौदागर समर्थकांची नाराजी दूर करण्यात माजी आमदार राहुल मोटे यांना कितपत यश येते हे पाहावे लागणार आहे.