परंडा (प्रतिनिधी): आगामी नगरपरिषद निवडणुक ही झालेल्या विकासकामांवर व पुढे परंडा शहराच्या विकासाचे ध्येय ठेऊनच माजी आमदार राहूल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुक लढवणार असून, नगर परिषदच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येऊन पुढील पंचवार्षिकेतही राष्ट्रवादी काँग्रेसचीच एकहाती सत्ता राहणार असल्याचा दावा नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दि. २६ रोजी निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
परंडा नगरपरिषदेच्या निवडणूका जाहिर होण्यापुर्वीच परंडा शहरातील राजकारण तापले असुन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोच्या फैरी सुरू झाल्या आहेत. परंडा नगर परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असुन राष्ट्रवादीने शहरात विकासकामे केली नसल्याने कोणत्या मुद्यांवर मते मागणार असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दि. २५ डिसेंबर रोजी पत्रकारांशी बोलताना केला होता. ज्ञानेश्वर पाटील यांनी केलेल्या आरोपांचे उत्तर देताना नगराध्यक्ष जाकीर सौदागर म्हणाले की, गत पाच वर्षांत शहराच्या विकासासाठी नि:पक्षपाती काम केले असून राहुल मोटे आमदार असताना शहरातील अनेक ठिकाणच्या स्मशानभुमी, मंदिरासाठी रस्ते यासारखी अनेक विकासकामे केली असल्याचे सांगितले आहे. नगर परिषदेच्या वतीने शहरातील माळी गल्ली, मंडई मुजावर गल्ली अशा, अनेक ठिकाणी रस्ते, रेवणी भिमनगर, कवठे भिम नगर दलीत वस्ती भागात सुधारणा करण्यात आली. रमाई घरकुल योजनेअंतर्गत १६५ घरकुल मंजुर करण्यात आले. तर ३६ घरकुलांच्या कामाची वर्कआर्डर दिली. तसेच पंतप्रधान अवास योजनेअंतर्गत ६६५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून २४७ घरकुले पुर्ण करण्यात आले आहे. दोन वर्ष कोरोनामुळे निधी न मिळाल्याने पोलिस ठाणे ते बसस्थानक रस्त्याचे काम करता आले नाही. पुढील काळात सर्व कामे करणार असल्याचे सौदागर यांनी सांगितले. दर्गाह व कासीमबाग रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात आले आहे. पुढील काम निधीअभावी बंद असुन ते रस्ते पुर्ण करण्यात येतील. त्या रस्त्यासाठी एक रुपयाही उचलण्यात आलेला नाही, अशी माहिती सौदागर यांनी यावेळी बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बघून शिवसेनेने धसका घेतला असल्यानेच शिवसेना यूती आघाडीची भाषा करीत आहे. जर राष्ट्रवादीने विकासकामे केले नाहीत तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यूती आघाडीची भाषा का करीत आहेत? असा सवाल करून राष्ट्रवादी सर्व जागा जिंकेल असा दावा केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, शहराध्यक्ष वाजीद दखनी, नगरसेवक संजय घाडगे, सरफराज कुरेशी, बब्बू जिनेरी, शफी पठाण, बच्चन गायकवाड, शरीफ तांबोळी, तनवीर मुजावर, राजा माने, संतोष माळी, किरण डाके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.