श्रीनगर:जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य केले आहे. श्रीनगरच्या जीवन भागात सशस्त्र पोलिसांच्या 9व्या बटालियनवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जवान बसमधून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पंथा चौक-खोनमोह रस्त्यावर भारतीय राखीव पोलिसांच्या (IRP) 9व्या बटालियनच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान शहीद झाले, तर 11 जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांकडे शस्त्रे नव्हती, बसही बुलेटप्रूफ नव्हती
ज्या पोलिसांवर हल्ला झाला ती बस बुलेट प्रूफ नव्हती. बहुतांश पोलिस कर्मचाऱ्यांकडे त्यांचा बचाव करण्यासाठी बंदुका आणि इतर साहित्यही नव्हते. फार कमी पोलिसांकडे शस्त्रे होती. बस थांबवण्यासाठी दहशतवाद्यांनी टायरवर गोळीबार केला. यानंतर बसवर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.
या पोलिसांवर हल्ला
या हल्ल्यावेळी बसमध्ये एएसआई गुलाम हसन, कॉन्स्टेबल सज्जाद अहमद, कॉन्स्टेबल रमीज अहमद, कॉन्स्टेबल बिशम्भर दास, सेलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल संजय कुमार, सेलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल विकास शर्मा, कॉन्स्टेबल अब्दुल मजीद, कॉन्स्टेबल मुदस्सिर अहमद, कॉन्स्टेबल रविकांत, कॉन्स्टेबल शौकत अली, कॉन्स्टेबल अरशीद मोहम्मद, कॉन्स्टेबल शफीक अली, कॉन्स्टेबल सतवीर शर्मा, कॉन्स्टेबल आदिल अली, हे जवान होते.दरम्यान, यातील कोण शहीद झाले, याची माहिती अद्याप मिळाली नाही.
चकमकीत दहशतवादी ठार
रविवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील बरगाम भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, त्यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले, त्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला.