नवी दिल्ली-देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावला होता. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. मागील नऊ दिवसांच्या आकडेवारीतून असे समोर येते की, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 121% इतके वाढले आहे. 15 नोव्हेंबरला देशभरात 197 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
त्याच्या आठवड्याभरानंतर 23 नोव्हेंबरला मृत्यूचे प्रमाण वाढून 437 इतका झाला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ञांनी दिला असून, त्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार सावध झाले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने त्यासंबंधी 13 राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच कोरोना तपासणीची संख्या कमी झाल्याने नाराजी देखील व्यक्त केली आहे.
अॅटिजेन ऐवजी आरटीपीसीआर तपासणी करा
पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण 2.1% इतका असून, मागील चार आठवड्यातील ही उच्चांकी मानल्या जात आहे. त्यात दार्जिलिंग, दक्षिण दिनाजपुर, हावडा, पश्चिम 24 परगना, दक्षिण 24 परगना, जलपाईगुड़ी आणि कोलकत्ताचा समावेश आहे. त्यामुळे या शहरात अॅटीजेन तपासणी न करता आरटीपीसीआर तपासणी करावी. अशा सुचना केंद्राकडून देण्यात आल्या आहे.
या राज्यांना देण्यात आले पत्र
केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पश्चिम बंगाल व्यतिरिक्त गोवा, जम्मू-काश्मीर, केरळ, लद्दाख, महाराष्ट्र, मणिपुर, मेघालय, मिजोरम, नागालँड, पंजाब, राजस्थान आणि सिक्किम या राज्यांना केंद्रीय आरोग्य विभागाकडून पत्र पाठवण्यात आले असून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. केरळात ऑगस्टमध्ये 2.96 लाख कोरोना तपासण्या करण्यात आल्या होत्या. मात्र सध्या कोरोना तपासणीत घट झाली असून केवळ 56 हजार तपासण्या एका महिन्यात केल्या जात आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा दावा- तिसरी लाट डिसेंबरमध्ये
महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरी लाट ही डिसेंबर महिन्यात येऊ शकते असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. कोरोना तिसरी लाट ही सौम्य प्रकारची असून, त्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचे देखील टोपे म्हणाले आहे. नागरिकांनी गाफिल राहू नये. शासनाने कोरोना संबंधी लादलेल्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.