Advertisement

पाटणा साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 4 दोषींना फाशी, 2 जणांना जन्मठेप

प्रजापत्र | Monday, 01/11/2021
बातमी शेअर करा

पाटणा: 2013 मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीदरम्यान झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने शिक्षा जाहीर केली आहे. पाटणाच्या NIA न्यायालयाने सोमवारी गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 दोषींना फाशीची, 2 दोषींना जन्मठेपेची, 2 दोषींना 10 वर्षांची आणि एका दोषीला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय एका आरोपीला पुराव्याअभावी निर्दोष घोषित करण्यात आले. 

 

एनआयएचे विशेष न्यायाधीश गुरविंदर मल्होत्रा ​​यांनी इम्तियाज अन्सारी, मुजिबुल्ला, हैदर अली, फिरोज अस्लम, नोमन अन्सारी, इफ्तिखार, अहमद हुसैन, उमर सिद्दीकी आणि अझरुद्दीन यांना 2013 च्या गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवले. तर फखरुद्दीनला पुराव्याअभावी निर्दोष घोषित करण्यात आले. या प्रकरणी एनआयएने 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, त्यापैकी एका आरोपीचे वय कमी असल्याने हा खटला बाल न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार उर्वरित दहा आरोपींविरुद्ध एनआयए न्यायालयात खटला सुरू होता.

 

काय आहे प्रकरण ?

बिहराच्या पाटणा येथील गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 रोजी झालेल्या भाजपच्या हुंकार रॅलीचे प्रमुख वक्ते नरेंद्र मोदी, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. या सभेदरम्यान पक्षाचे इतर मोठे नेतेही उपस्थित होते. यावेळी मैदानात बॉम्बस्फोटांची मालिका घडली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. हैदर अली आणि मुजिबुल्ला हे गांधी मैदान बॉम्बस्फोटाचे सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. एनआयएने आरोपींना अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता इम्तियाजने अनेक नावे पुढे केली. त्यानंतर तपास यंत्रणेने बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडसह दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना पकडले. या चौकशीत बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणही उघड झाले होते

Advertisement

Advertisement