बीड : कोरोना काळात खाजगी रुग्णालयांची बिल आकारणी चर्चेत आली होती, त्यावेळी शासन आणि प्रशासनाने खाजगी रुग्णालयांच्या बिलांवर लक्ष ठेवण्यासाठी ऑडिटरची पथकं गठीत केली असून त्यांनी प्रमाणित केल्यानंतरच बिल आकारणी केली जाते असे सांगितले होते. खाजगी रुग्णालयांनी जास्तीत जास्त किती दर घ्यावेत हे देखील ठरवून देण्यात आले होते. मात्र असे असतानाही बीड जिल्ह्यात रुग्णालयांनी लाखोंची बिले रुग्णांकडून उकळल्याचे जनआरोग्य अभियानाच्या जनसुनवाईत समोर आले आहे . हे सारे होत असताना लेखा परीक्षण करणाऱ्या पथकांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती का असा प्रश्न आता या निमित्ताने समोर येत आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर झाला होता. विशेषतः दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाची लागण तर वाढलीच पण मृत्यूचे प्रमाण देखील वाढले होते . सरकारी दवाखाने हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. पहिल्या लाटेत खाजगी रुग्णालयांनी मनमानीपणे बिल आकारल्याचे समोर आल्यानंतर शासनाने खाजगी रुग्णालयांची दर निश्चित केले होते. तसेच खाजगी रुग्णालये या दरांप्रमाणेच आकारणमी करीत आहेत का यासाठी लेख परीक्षकांची पथके देखील गठीत केली होती.
मात्र असे असतानाही जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांनी अनेकांना लाखोंची बिले आकारल्याचे समोर आले आहे. ज्यांना रुग्णालयात १०-१२ दिवस थांबावे लागले अशांना ३ लाखापर्यंत बिल आकारण्यात आले आहे, तर काहींचे बिल ५ लाखाच्या पुढे गेले आहे. मानवलोक, समता प्रतिष्ठान आणि इतर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या जण आरोग्य अभियानाने हा प्रकार समोर आणला आहे.
जन आरोग्य अभियानाच्या जनसुनवाईत बीडमध्ये हा प्रकार समोर आला आहे.आरोग्य विभागाचे अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यांच्यासमोर झालेल्या सुनावत अनेक महिलांनी वाढीव बिलांची कैफियत मांडली . आम्हाला लाखो रुपयांची बिले देण्यात आली आहेत, तक्रार केली तरी त्याची फारशी दखल घेतली जात नाही असेही या महिलांनी सांगितले . त्यामुळे जिल्हा प्रशासनाची लेखा परीक्षणासाठीची पथके नेमके काय करीत आहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
उपचारासाठी झालं लाखोंचे कर्ज , तरीही पतीचे झाले निधन , आता कर्ज फेडायचं कसं आणि जगायचं कस ?
याच सुनावत एका महिलेने सांगितलेली परिस्थिती अधिकच ह्रदयद्रावक आहे. त्यांच्या पतीला कोरोनाची बाधा झाली, त्यामुळे खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. उपचारासाठी अक्षरशः कर्ज काढावे लागले, त्यासाठी जमीन देखील गहाण टाकावी लागली. कर्ज काढून काही लाख रुपये जमा केले, मात्र त्यानंतरही पतीचे उपचारादरम्यानच निधन झाले. आता पुढचे आयुष्य जगायचे कसे, लेकरं सांभाळायची कशी आणि कर्जाचा डोंगर कसा फेडायचा ? असे अनेक प्रश्न सदर महिलेसमोर आहेत. अशीच परिस्थिती कमी अधिक फरकाने कोरोनामुळे एकल झालेल्या बीड जिल्ह्यातील शेकडो महिलांची आहे.
हेही वाचा
► आजची कोरोना बाधितांची संख्या