Advertisement

जायकवाडीचे सर्व २७ दरवाजे उघडले

प्रजापत्र | Thursday, 30/09/2021
बातमी शेअर करा

पैठण - नाशिक जिल्ह्यात तसेच जायकवाडी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठा 98.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे धरणाच्या 27 दरवाजातून तबबल 89 हजार क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदी पात्रात 1 लाख 16 हजार क्युसेकपर्यंतचे पाणी सामावू शकते. मात्र जायकवाडी पाटबंधारेकडून गोदावरी नदी पात्रातील विसर्ग 1 लाखांपर्यंत ठेवण्यात येणार असल्याने पात्र सोडून पाणी जाणार नाही. यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, मात्र सावधानता बाळगावी असे पाटबंधारे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्यानंतर वरील धरणाचे पाणी जायकवाडी धरणाकडे येत आहे. त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात व नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. बुधवारी रात्री धरणातील पाणीसाठा 98.62 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे रात्री 1:30 वाजता 1 ते 9 आपत्कालीन दरवाजे अडीच फुटाने उचलण्यात आले तर 9 ते 27 क्रमांकाचे दरवाजे हे 4 फूट उचलून एकूण 89 हजार 604 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

 

मंगळवारी धरणात लक्षणीय वाढ झाल्यानंतर बुधवारी सकाळी 18 दरवाजे उघडून सुरुवातीला 9 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता. यानंतर धरणातील येणाऱ्या पाण्याची वाढती आवक लक्षात घेता सायंकाळी 5 वा. पुन्हा या दरवाजातून 47 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला.

दरम्यान बुधवारी रात्री धरणात आवक वाढल्याने व धरण 98 टक्क्याच्या पुढे गेल्याने रात्री दिड वाजता धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आली आहेत. सध्या धरणातून तब्बल 89 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरु आहे. हा विसर्ग गोदावरी नदी पात्रात 1 लाख क्युसेकपर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या अगोदर 2005 ते 2009 असे सलग पाच वर्षे धरण भरले होते. 2006 मध्ये धरण भरल्यानंतर तब्बल 2 लाख 54 हजार क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्याचप्रमाणे 2019, 2020 आणि 2021 मध्येही सलग धरण भरल्याने विसर्ग करण्यात आला. दरम्यान नाशिक तसेच जायकवाडी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राक्षसभुवनचे शनी मंदिर, पांचाळेश्वरचे दत्त मंदिर पाण्यात
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने गोदावरी सध्या दुथडी भरुन वाहत आहे. तर या नदीच्या तिरावर असलेले साडेतीन पिठापैकी एक पिठ राक्षसभुवनचे शनीचे मंदिर पाण्याखाली गेले आहे. तसेच पांचाळेश्वर येथील श्रीदत्तात्रेय यांचे भोजनस्थान पुर्णतः पाण्याखाली गेले आहे.

Advertisement

Advertisement