कल्याण (ठाणे) : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये देखील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या ८ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी मुदर तालवाला याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कल्याणच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहणारी आठ वर्षीय पीडित चिमुकली याच परिसरातील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जायची. काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेली होती. त्यामुळे शिक्षिकेचा पती शिक्षक मुदर तालवाला हा मुलांची शिकवणी घेत होता. या दरम्यान पीडित आठ वर्षीय चिमुकली शिकवणीला जायला तयार नव्हती. जेव्हा तिची आई शिकवणीला जायला सांगत तेव्हा ती रडायला सुरुवात करायची.
पीडितेच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार
पीडितेच्या आईला संशय आला. आईने मुलीला विश्वासात घेत विचारलं तेव्हा मुलीने घडलेला प्रकार हावभाव करुन दाखविला. त्यानंतर आई समजून गेली की आपल्या मुलीसोबत काय प्रकार घडला आहे, तो कोणी केला असावा या संदर्भातील सगळी माहिती बाजारपेठ पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या
या प्रकरणाची गंभीर दखल घेत बाजारपेठ पोलिसांनी चौकशी सुरु केली. पोलिसांनी या प्रकरणी ४२ वर्षीय शिक्षक मुदर तालवाला याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली. दरम्यान, एका शिक्षकाने आठ वर्षीय विद्यार्थीनीवर अशा प्रकारचं कृत्य केल्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासली गेल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून देण्यात आली आहे.