मुंबई: राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. अशी परिस्थिती असताना आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही जवळ येऊ लागला आहे. हे लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील रुग्णालयांना महत्वाचे आवाहन केले आहे. आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधा मग ते ऑक्सिजन, औषधे, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी या गोष्टींचे ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणूंविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केलेली आहे, असे असले तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.