बेंगळुरू : कर्नाटकच्या बेंगळुरूत एका भीषण अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. मंगळवारी पहाटे ही दुर्घटना घडली. अत्यंत वेगात आलेली ऑडी गाडीवरचा चालकाचा ताबा सुटून ही गाडी रस्त्याच्या बाजुला लावलेल्या वीजेच्या खांबाला जोरात धडकील. या अपघातात 'द्रमुक मुन्नेत्र कळघम' पक्षाच्या आमदाराच्या मुलाचा आणि सुनेचाही मृत्यू झालाय.
या अपघातात तामिळनाडूच्या होसूर मतदारसंघाचे 'द्रमुक मुन्नेत्र कळघम' पक्षाचे आमदार वाय प्रकाश यांच्या मुलाचा आणि सुनेनं आपले प्राण गमावलेत.
मुलगा करुणा सागर आणि सून बिंदू यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा देताना आमदार वाय प्रकाश यांना दु:ख अनावर झालं. बेंगळुरूच्या मंगला कल्याणनमटप्पा भागात हा अपघात झाला. या अपघताता सहा जणांनी जागेवरच अखेरचा श्वास घेतला तर एकानं उपचारासाठी रुग्णालयात हलवत असताना रस्त्यातच प्राण सोडले.
अपघातात चक्काचूर झालेली ऑडी क्यू ३ ही गाडी आमदार वाय प्रकाश यांच्याच नावावर होती. या अपघाताची दृश्यं पाहिल्यानंतर हा अपघात किती भयानक होता, याचा अंदाज येऊ शकतो. हा अपघात एवढा भयंकर होता की गाडीचे तुकडे तुकडे झालेत. अपघातानंतर गाडीचा बोनेट, सीट, चाकं अतिशय वेगवेगळ्या बाजुला फेकले गेले.