मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात जाऊन रूटीन चेकअप करून घेतलं. अटकनाट्यामुळे राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मंगळवारपासून ब्रेक लागला असून ही यात्रा आता उद्यापासून (शुक्रवार) पुढचा प्रवास सुरू करणार आहे. त्याआधी त्यांनी तपासण्यांसाठी ते रुग्णालयात गेले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्यापासून परत एकदा जन आशीर्वाद यात्रा सुरू करत आहेत. म्हणूनच आज लीलावती रुग्णालयात त्यांचं रूटीन चेकअप करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलेलं नाही, अशी माहिती महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी दिली.
दरम्यान, अटकनाट्यामुळे नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मंगळवारी ब्रेक लागला होता. महाड येथे सोमवारी पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राणे यांना मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये अटक करण्यात आली होती. पोलीस कारवाईसाठी पोहचले तेव्हा राणे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यात रक्तदाब आणि शुगरचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले होते. मंगळवारीच राणे यांना संगमेश्वरात अटक झाली व रात्री उशिरा महाड कोर्टात त्यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांची सुटकाही झाली. मुख्य म्हणजे राणे यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना तब्येतीचे कारणही दिले होते. जामीन मिळण्यात हे महत्त्वाचे कारण ठरले होते. जामीन मिळाल्यानंतर राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर भूमिका मांडली. त्याचवेळी शुक्रवारपासून जन आशीर्वाद यात्रा पुढचा प्रवास करेल असे ते म्हणाले होते. त्यानुसार राणे यांची यात्रेसाठी पुन्हा तयारी सुरू झाली असून कोकणकडे निघण्याआधी ते आज लीलावती रुग्णालयात पोहचले व त्यांनी रूटीन चेकअप करून घेतलं.