पाटोदा-मागील सात महिन्यांपासून पाटोद्याच्या ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका नसल्याने अनेक अडचणींचा सामना रुग्णांना करावा लागत असे.किरकोळ दुरुस्तीअभावी ही रुग्णवाहिका बंद असल्याचे सांगितले जात होते.दैनिक प्रजापत्रने 'साडेपंधरा हजारांसाठी सात महिन्यांपासून रुग्णवाहिका गॅरेजवर' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केल्यानंतर आ.सुरेश धस पाटोदकरांच्या मदतीला धावून आले आहेत.आमदार फंडातून ते नव्या रुग्णवाहिकेसाठी मदत देणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर यांनी 'प्रजापत्र' शी बोलताना दिली.
पाटोद्याच्या ग्रामीण रुग्णालयांतर्गत २० गावांचा समावेश आहे. या २०गावातील महिलांना प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयात येता यावे म्हणून जननी सुरक्षा योजनेतून या ठिकाणी रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली होती. या रुग्णवाहिकेचा अनेक रुग्णांना फायदा झाला. मात्र २०२० मध्ये ही रुग्णवाहिका खराब झाली. डिसेंबर २०२० पासून दुरुस्तीसाठी म्हणून ही रुग्णवाहिका बीडच्या गॅरेजवर लावण्यात आली आहे. दुरुस्तीसाठीचे साडेपंधरा हजाराचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असले तरी त्याला अद्याप मंजूरी न मिळाल्याने सात महिन्यापासून ही रुग्णवाहिका दुरुस्तीशिवाय गॅरेजवरच उभी आहे.ही बाबत दैनिक प्रजापत्रने बातमी प्रकशित केल्यानंतर आ.सुरेश धस यांनी आमदार फंडातून पाटोद्याच्या रुग्णालयासाठी रुग्णवाहिका देणार असल्याचे सांगितले आहे.दरम्यान यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.