बीड-कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक ठिकाणाहून माणूसकीचे झरे वाहत असतानाच काही ठिकाणी मात्र माणूसकीलाच चूड लावल्याचा प्रकार समोर येत आहे. कोरोनाने मृत्यु पावलेल्या स्वकीयाच्या अंत्यविधीलाही अगदी घरातले नातेवाईक पाठ फिरवत असतानाच प्रशासनाने अंत्यविधी केल्यानंतर राख न्यायलाही नातेवाईक फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बीड सारख्या ठिकाणी अंत्यविधी करणार्या कर्मचार्यालाच अस्थिसह रक्षाविसर्जन करावे लागत आहे.
भारतीय संस्कृतीत माणसाच्या मृत्युनंतर त्याच्या अस्थि आणि रक्षेचे विसर्जन हा आस्थेचा विषय आहे. मृत्युनंतरची राख पाण्यात टाकण्याऐवजी अनेकांनी आता त्या राखेत झाडे लावणे सुरु केले. प्रकार कोणताही असला तरी हा उपक्रम सामान्यांच्या भावनांशी निगडीत असलेला आहे. मात्र आता कोरोनाकाळात या भावनांनाच चूड लागत असल्याचे चित्र आहे.
बीडच्या भगवानबाबा स्मशानभूमीत रोज दहा ते बारा मयतांवर अंत्यसंस्कार केले जातात. यातील बहुतांश अंत्यसंस्कार करताना जवळचे नातेवाईकही बोलावून देखील फिरकत नसल्याचे दिसत आहेत. त्या पलिकडे जावून ज्यावेळी अंत्यविधी पूर्ण होतो त्याच्या दुसर्यादिवशी राख घेवून जायला या असा निरोप देवून देखील नातेवाईक राख घ्यायलाही फिरकत नसल्याचे चित्र मागच्या काही दिवसात बीडमध्ये पहायला मिळत आहे. शहरातील कोरोनाबळींचा आकडा इतका मोठा आहे आणि रोज इतक्या मृतदेहांना अग्नी द्यावा लागत आहे की, स्मशानातील शवदाहिन्या कमी पडत असून अगदी सिमेंटच्या कट्ट्यावर देखील सरण रचून प्रेताला अग्नी द्यावा लागत आहे. त्यामुळे नातेवाईक येत नाही म्हणून राख तशीच ठेवावयला देखील स्मशानात जागा नाही अशा परिस्थितीत नातेवाईकांना फोन करुन देखील ते न आल्यास आम्हालाच अस्थी आणि रक्षा विसर्जन करावे लागते असे भगवानबाबा स्मशानभूमीतील कर्मचारी दिपक शेनगुरे यांनी सांगितले. कोरोना काळात एकमेकाला आधाराची गरज असताना माणूसकीला चूड लावणारा हा प्रकार वेदनादायी आहे.