बीड-सारे जग आता अनलॉकच्या मार्गावर आहे, इतके दिवस घरातच बसायला सांगणारे केंद्र आणि राज्य सरकार सुद्धा आता कोरोनासह जगायला सांगत आहे, अशावेळी बीड जिल्ह्यातील ५ शहरे १० दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. सारे जग वेगळी भूमिका घेत असताना जेव्हा एखादे जिल्हाधिकारी लॉकडाऊनचा निर्णय घेतात,त्यावेळी त्यांनी या क्षेत्रातील तज्ञांची मते घेऊनच हा निर्णय घेतला असेल आणि लॉकडाऊन हा कोरोना रोखण्यावरचा प्रभावी उपाय आहे याची त्यांची स्वतःची खात्री पटली असेलच,त्याशिवाय थोडीच ते निर्णय घेणार ? त्यामुळे आता लॉकडाऊन चांगले का वाईट याबद्दल बोलून काही उपयोग होणार ही नाही. कारण सरकारनेच सारे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, ते-ते वापरत आहेत. पण जसे लॉकडाऊन करण्यासाठी अधिकार वापरले जातात तसाच अधिकारांचा वापर कोरोनाग्रस्तांना सुविधा देण्यासाठी,पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि गोरगरिबांना किमान सन्मानाने जगता यावे यासाठी वापरले जाणार आहेत का ?
बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचे जे हाल होत आहेत, त्याचे रोज नवे किस्से समोर येत आहेत. आरोग्य विभागाने भलेही बीड जिल्ह्यात तीन हजार बेडची व्यवस्था केल्याचे सांगितले असेल,मात्र जमिनीवरचे वास्तव फार वेगळे आहे. जिल्हा रुग्णालयाला कोव्हिड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे, मात्र याठिकाणी दाखल रुग्णांना किमान सुविधा देण्याइतकेही मनुष्यबळ आज आरोग्य विभागात नाही. दोन वॉर्डात एक नर्स असेल तर त्यांनी किती रुग्ण पाहायचे आणि कसे ? तज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे ते वेगळेच. जे बीडचे ते अंबाजोगाईचे,येथील 'स्वाराती' रुग्णालयात अडीचशे खाटा असल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कोव्हिडसाठी १२० च वापरल्या जाऊ शकतात असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तेथेही मनुष्यबळाचा अभाव आहेच. प्रशासनाने यासाठी काम करायचे असते आणि अधिकार वापरायचे असतात.
जे कोव्हिड हॉस्पिटलचे तेच कोव्हिड केअर सेंटरचे , या केंद्रात जाण्यापेक्षा कोरोना परवडला असे लोक म्हणत आहेत.येथे ना वेळेवर जेवण मिळते,ना स्वच्छतेच्या सुविधा आहेत. ज्यावेळी जिल्हाधिकारी पाच शहरे बंद करण्याचा आदेश काढत होते, त्या दिवशीही केजमध्ये दुपारी २ वाजेपर्यंत रुग्णांना जेवण मिळाले नव्हते, मग कोरोनावर मात करायची कशी ? कायद्याचा बडगा यासाठी वापरयाचा असतो.
कोरोना रोखायचा म्हणून कंटेनमेंट झोन केले पाहिजेतच,प्रशासनाने केले देखील, गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये पत्रे ठोकणे सोपे असते,मात्र प्रशासनाची 'ती ' ताकद लोखंडी सावरगावचा दवाखाना सुरू करण्यासाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर ठोकून घेण्यासाठी चार महिने देखील वापरता येत नसेल तर ते अपयश कोणाचे ? गोरगरिबांवर निर्बंध लादणे सोपे असते,मात्र प्रशासनाने चार महिन्यांत पायाभूत सुविधांसाठी काय केले ? आजही जर कोव्हिड रुग्णालयांमधील ड्रेनेजसुद्धा चांगले नसेल तर लोकांनी उपचार घ्याचे कोठे ?
ज्यावेळी संकट मोठे असते त्यावेळी सर्वांना सोबत घेऊन काम करायचे असते, अधिकारांचे विकेंद्रीकरण करायचे असते.मात्र कोरोनाच्या महामारीत लोकप्रतिनिधींना विचारायलाही प्रशासन तयार नाही,सगळेच निर्णय, मग शहरे लॉकडाऊन करण्यापासून होम आयसोलेशन कोणाला द्यायचे आणि वॉर्ड बॉयची नियुक्ती द्यायची की नाही इथपर्यंतचे अधिकार मोजक्याच लोकांभोवती केंद्रित होणार असेल तर याला काय म्हणणार ?
लॉकडाऊनच आदेश काढणे सोपे असते, अमुक कलमाखाली तमुक करा म्हणणे सोपे आहे, पण सगळ्या कलमांपलीकडे सामान्य माणसांचे पोट आहे. अगोदरच अनेकांचा रोजगार गेला आहे, आता पुन्हा १० दिवस शहरे बंद झाली तर हातावर पोट असणारांनी काय करायचे ? जगायचे कसे ? तांदूळ आणि गहू दिले म्हणजे सारे भागते का ? रोजच्या पिठामिठाची सोय करण्यासाठी ज्यांना रोजच जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यांनी आपलं आयुष्यच लॉकडाऊन करायचं का ?
लॉकडाऊन आवडे सर्वांना
जरा कोठे कोरोनाचे रुग्ण निघाले की लॉकडाऊन करा म्हणून ओरडणाऱ्यांची संख्या आज समाजात आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना संपायचा असता तर केंव्हाच संपला असता हे त्यांना कळत नाही असे नाही, पण लॉकडाउनचा या वर्गाला काहीच फटका बसत नाही, ज्यांचे पगार सुरु आहेत,ज्यांच्या घरात संपत्ती आहे, ज्यांना असेही कधी पिठामिठासाठी बाहेर पडावे लागत नाही, ज्यांच्या एका इशाऱ्यावर सारे काही घरपोच होते त्या लोकांना लॉकडाऊन आवडेलच, आणि दुसरे म्हणजे व्यापारी,लॉकडाऊन असले तरी बड्या व्यापाऱ्यांचे काही अडत नाही, समोरून दुकान बंद असले तरी मागच्या दरवाज्याने सारे काही सुरूच असते,उलटे याकाळात किंमती वाढवून माल विकत येतो हे मागच्या काही काळात पाहायला मिळाले आहे. साडेसात हजाराला असणाऱ्या गायछापच्या पोत्यासाठी पहिल्या लॉकडाउनच्या काळात तीस हजार रुपये मोजावे लागले होते हे वास्तव आहे. गायछाप जगण्यासाठी आवश्यक वस्तू नाही तरी त्याची परिस्थिती अशी आहे, मग जीवनावश्यक गोष्टींमध्ये काय झाले असेल याची कल्पना करवत नाही. त्यामुळे ज्यांना काही तोशीस पडत नाही किंवा ज्यांना स्वतःचे उखळ पांढरे करून घेता येते त्यांना लॉकडाऊन आवडणारच, पण या मूठभर लोकांपलीकडे देखील समाज आहे, आणि तो खूप मोठा आहे, त्यांचा वाली कोणी होणार आहे का ?