नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या लसीसंदर्भात (Covid-19 Vaccine)एक मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ते ४४ वर्षे वयोगटातील लोक ऑनलाइन नोंदणीशिवाय देखील कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत. १८ ते ४४ वर्षांच्या लोकांना आता लसीकरण केंद्रातही नोंदणी करता येणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल. दरम्यान, १ मेपासून केंद्र सरकारने १८ ते ४४ वर्षांच्या लोकांना लस देण्यास परवानगी दिली आहे.
लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले होते, परंतु ऑनलाइन नोंदणीमध्ये दोन प्रकारच्या अडचणी येत होत्या. पहिली म्हणजे गावातील लोकांकडे स्मार्टफोन नव्हते, त्यांना स्लॉट बुक करण्यात अडचणी येत होत्या. याशिवाय, अनेक राज्यांमधून अशाही बातम्या येत होत्या की, लोक स्लॉट बुकिंग करूनही लसीकरणासाठी केंद्रावर पोहोचत नाहीत. तर अशा परिस्थितीत ही लस वाया जाणार होती, परंतु आता ही उर्वरित लस नोंदणीशिवाय आलेल्या लोकांना दिली जाणार आहे.
राज्यांना आदेश
ऑनलाईन नोंदणीची सुविधा राबविण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना जिल्हा प्रशासनाबरोबर काम करण्याचे आदेश दिले आहेत. यासह मंत्रालयाने राज्यांना असेही सांगितले की, स्वाक्षरी नोंदणी दरम्यान कोणतीही गर्दी होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.