सोलापूर - राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपाच्या समाधान आवताडे यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, सहाव्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या समाधान आवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडूच शकले नाहीत. समाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला.
महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात होते, पण इतर उमेदवारांना हजार मतंही घेणं अवघड बनलं होतं. समाधान आवताडे यांनी 19 व्या फेरीपर्यंत म्हणजे पढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मतमोजणी होईपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. त्यानंतर, मंगळवेढा येथील मतमोजणीला सुरुवात होताच, त्यांच्या आघाडीच्या मतांमध्येही चांगली वाढ झाल्याचे सातत्याने दिसून आलं.
पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 36 फेऱ्या पार पडल्या. तर, सुरुवातीला पोस्टल मतमोजणी घेण्यात आली. त्यामध्ये भगिरथ भालकेंना आघाडी मिळाली होती. तेथून पहिल्या 5 फेऱ्या होईपर्यंत भालकेंनी आघाडी कायम ठेवली. मात्र, त्यानंतर, आवताडेंनी आघाडी घेत शेवटपर्यंत मतांचा आलेख वाढतच नेला. अखेरच्या टप्प्यात ते भूमिपुत्र असलेल्या मंगळवेढा मतदारसंघातूनही त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं. त्यामुळे, त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं असं समजून कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केलाय.