मुंबई-गेल्या वर्षभरापासून संपर्णू देशासह महाराष्ट्रात कोरोनोच्या परिस्थितीत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना व शासकीय यंत्रणेवर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला असताना देखील राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अशा बिकट परिस्थितीत विभागास प्राप्त झालेल्या निधीचा संपूर्ण खर्च करण्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी बजावली आहे. विभागाचा गेल्या पाच वर्षातील खर्चाचा आलेख पाहता चालू वर्षात सर्वाधिक खर्च झालेला आहे, ही विशेष बाब म्हणावी लागेल.
राज्य शासनाकडून चालू वर्षात (2020-21) मध्ये प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय योजनांच्या 91 टक्के निधी तर अनुसूचित जाती घटक कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजनेच्या प्राप्त झालेला निधी 99.53 टक्के खर्च विभागाने केला आहे. विभागाच्या या सर्वोत्तम कामगिरी बद्दल ना. धनंजय मुंडे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह विभागातील अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
सन 2020-21 मध्ये राज्य शासनाकडून समाजकल्याण विभागास जवळपास रूपये 2440 कोटी 24 लाख इतका निधी प्राप्त झालेला होता, त्यापैकी विभागाने रू. 2225 कोटी 80 लाख खर्च केल्याने 91 टक्के निधी खर्च झालेला आहे. तर जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनुसूचित जाती घटक कार्यक्रम करीता सन 2020-21 मध्ये रू. 2728 कोटी 64 लाख विभागास प्राप्त झाले होते, त्यापैकी विभागोन रू. 2715 कोटी 87 लाख खर्च केल्याने 99.53 टक्के निधी खर्च झाला आहे. समाजातील मागासवर्गीय घटकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी समाजकल्याण विभागाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. विभागाने कसोशीने प्रयत्न केल्याने आज पुर्णतः निधी खर्च झालेला दिसून येत आहे. त्यासाठी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येते.