Advertisement

बाप-लेक दोघे डॉक्टर;कोरोनामुळे दोघांचा पाठोपाठ मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 17/04/2021
बातमी शेअर करा

 कल्याण: राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असताना, ह्दय हेलावून टाकणारी एक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या वडिल आणि मुलाचा कोविडमुळे काही तासाच्या फरकाने पाठोपाठ मृत्यू झाला. डॉ. नागेंद्र मिश्रा (५८) आणि डॉ. सूरज (२८) असे मृत बाप-लेकाचे नाव आहे. सूरजच्या आईची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वसईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. नागेंद्र आणि डॉ. सूरज यांचे लसीकरण झाले होते का? ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण दोघेही मागच्यावर्षभरापासून कोरोनाग्रस्तांची काळजी घेत होते.

 

डॉ. नागेंद्र आणि डॉ. सूरज यांच्या मृत्यूमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र समोर आले आहे. मुंबई महानगर क्षेत्रात बेड्सची अपुरी संख्या आणि त्यामुळे स्थिती किती भयंकर आहे ते पुन्हा एकदा समोर आले आहे. कुटुंबातील तिन्ही सदस्य वेगवेगळया महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होते. डॉ. नागेंद्र मिश्रा हे ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल होते. शुक्रवारी वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. मुलगा सूरजला गोरेगावमधील एका खासगी रुग्णालयात बेड मिळाला. डॉ. नागेंद्र यांच्या पत्नीवर वसई-विरारमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

डॉ. नागेंद्र यांचा टिटवाळा खडवली येथे दवाखाना होता तर मुलगा सूरजचा भिवंडीत दवाखाना होता. कल्याण पश्चिमेला गांधारी येथे हे कुटुंब राहत होते. नोव्हेंबर २०२० मध्ये सूरजचे लग्न झाले होते. डॉ. नागेंद्र यांचा दुसरा मुलगाही डॉक्टर आहे. डॉ. नागेंद्र यांचा आधी मृत्यू झाला काही तासाने मुलाचा मृत्यू झाला.

Advertisement

Advertisement