बीड : बीड जिल्ह्यात रेमडेसिविरच्या काळ्या बाजाराबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असतानाच येथील लाईफ लाईन हॉस्पिटलशी संलग्न लाईफलाईन मेडिकलमध्ये रेमडेसिविरच्या एका इंजेक्शनसाठी तब्बल 5 हजार 400 रुपये किंमत आकारण्यात आली. या किमतीवर दोन इंजेक्शन विकल्याचे गुरुवारी समोर आले असून या प्रकरणात इंजेक्शन खरेदी करणारे संतोष सोहनी यांनी शहर पोलीसात तक्रार दिली आहे.
बीड जिल्ह्यातच अन्न औषध प्रशासन विभागाच्या आशिर्वादानेच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याचे गुरुवारी पुन्हा स्पष्ट झाले. येथील लाईफलाईन मेडिकलला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा देण्यात आला होता. गुरुवारी संतोष सोहनी हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. त्या वेळी मेडिकलवाल्याने इंजेक्शनवर 5 हजार 400 इतकी किंमत असल्याचे सांगत त्यांच्याकडून दोन इंजेक्शनसाठी 10 हजार 800 रुपये घेतले. या प्रकारानंतर संतोष सोहनी यांनी बीड शहर पोलीसात तक्रार दिली आहे. या प्रकरणात चौकशी करुन पुढील कारवाई होईल असे शहर पोलीसांनी सांगितले.
औषध निरीक्षकांची भूमिका संशयास्पद
रेमडेसिविरच्या किंमतीवर महाराष्ट्रात मर्यादा घालण्यात आलेली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री वारंवार 1400 रुपयापेक्षा अधिक किमतीला हे इंजेक्शन विकता येणार नाहीत असे सांगत आले आहेत. याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाला आहे. यापेक्षा अधिक किमतीने हे इंजेक्शन विकले जाऊ नये हे पाहण्याची जबाबदारी अन्न औषध प्रशासनाची आहे. मात्र बीड शहर पोलीसात 5 हजार 400 रुपयांनी इंजेक्शन विकल्याची तक्रार आल्यानंतरही औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे कुठलीही ठोस भूमिका न घेता निघून गेले. त्यामुळे रामेश्वर डोईफोडे नेमके कोणाचे हित जपण्यसाठी आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे.