मुंबई-कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशातील कोरोनाची स्थिती जोवर सुधारत नाही तोवर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात बंद राहणार आहे, असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं ट्विट केलं आहे.
देशातील प्रत्येक स्थानिक औषध निर्मिती संस्थांना त्यांच्या संकेतस्थळावर रेमडेसिवीरचा उपलब्ध साठ्याची माहिती देण्याचेही आदेश केंद्रानं दिले आहेत. याशिवाय देशातील सर्व औषध प्रशासन आणि अधिकाऱ्यांना रेमडेसिवीर औषधांच्या साठ्याची इत्यंभूत माहिती आणि नोंद घेण्याच्या सूचना देखील केंद्रानं जारी केल्या आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी देखील योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. '
राजेश टोपे यांनीही केली होती निर्यातबंदीची मागणी
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत रेमडेसिवीरच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घालावी, अशी मागणी केली होती. राज्यातील रुग्णांना रेमडेसिवीर सहज उपलब्ध व्हावे यासाठी याचा देशपातळीवर निर्णय व्हावा असं टोपे म्हणाले होते.