कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. दुसरीकडे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावं यासाठीदेखील राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. सध्या ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना करोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्रकारांसाठी विनंती केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पत्रकारांना लस देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले आहेत की, “आज आपल्या एका पत्रकार मित्राचे करोनामुळे निधन झाले. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती”.
ANI च्या पत्रकाराचं निधन
एएनआय या वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. त्यांना करोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.