Advertisement

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

प्रजापत्र | Sunday, 04/04/2021
बातमी शेअर करा

मुंबई-राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी  राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी ३ वाजता ही बैठक होणार असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती आहे. त्यानंतर सायंकाळपर्यंत लॉकडाऊनचे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती असून 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.  आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.  
                  राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.  महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला होता.

 

Advertisement

Advertisement