कडक निर्बंध लावण्याबरोबर मर्यादित स्वरुपाचा लॉकडाउन लागू करण्यात आला. लोकांनी करोनाच्या प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन केले नाही आणि परिणामी जर करोनाचा संसर्ग वाढतच राहिला तर शेवटचा पर्याय म्हणून राज्यात लॉकडाउन लागू करावा लागेल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. शिवाय या आठवड्यात राज्य सरकार राज्यात लॉकडाउन लागू करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसे संकेतही मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. आता मुख्यमंत्री राज्यासाठी कठोर निर्बंध लागू करणार की लॉकडॉउन घोषित करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत आहेत. आपल्या संबोधनात मुख्यमंत्री नेमके काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात लॉकडाउन लागू करू नये असे विरोधकांपासून अनेक घटकांचे म्हणणे आहे. सरकारने देखील लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असे म्हटलेले आहे. मात्र, सरकारने आता नेमका काय विचार केला आहे याबाबत मुख्यमंत्री राज्याच्या जनतेशी संवाद साधत असताना स्पष्ट होणार आहे.
संवाद साधण्याआधी मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक
आज दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्षा या निवासस्थानी आढावा बैठ आयोजित केली आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यभराचा आढावा घेतला जाईल.