मुंबई, ०१ एप्रिल : गेल्या वर्षी लहान मुलांना कोरोनाव्हायरसची लागण होण्याची प्रकरणं खूपच कमी होती. पण या वर्षी कोरोनाचा नवा स्ट्रेनही दिसून आला आणि कोरोनाचं हे नवं रूप मात्र लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. एकिकडे प्रौढांचं कोरोना लसीकरण सुरू झालेलं असताना आता दुसरीकडे कोरोनाने लहान मुलांना आपलं शिकार बनवायला सुरुवात केली आहे. नुकतीच मुंबईतील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण तर वाढलंच आहे. शिवाय मुलांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या वर्षी लहान मुलांसाठी असलेला कोव्हिड वॉर्ड ओस पडला होता. पण आता मात्र तिथं रुग्ण येऊ लागले आहेत. नायर रुग्णालयात सध्या 36 कोरोनाबाधित मुलांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १३ मुलं मोठी तर २३ नवजात बालकं आहे. याचाच अर्थ नवजात बाळांमध्ये कोरोनाचं प्रमाण सर्वाधिक आहे.
लहान मुलांमधील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता त्यांनाही लवकरात लवकर कोरोना लस देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत अनेक लस उत्पादक कंपन्यांचं ट्रायल सुरू आहे. यूएसमधील फायझर कंपनीने आपल्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवालही जारी केला आहे. फायझर आणि बायोएनटेक कंपनीची कोरोना लस १२ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये १०० टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी, अशी मागणी लवकरच एफडीएकडे करणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
फायझरने आता ६ महिने ते ११ वर्षे वयोगटातील मुलांवर कोरोना चाचणी सुरू केल्याचं गेल्या आठवड्यात सांगितलं. फायझरशिवाय यूएसमधील मॉडर्नाने डिसेंबर, २०२० मध्ये १२ ते १७ वयोगटातील मुलांवर कोरोना चाचणी सुरू केली. तर आता १२ पेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचणी केली जात असल्याचं १६ मार्च, २०२१ला सांगितलं. जॉन्सन अँड जॉन्सनने तर लहान मुलांवर चाचणी केल्यानंतर आता बाळ आणि नवजात बालकांवरही चाचणी करण्याची योजना आखली आहे.