पुणे : आधुनिकतेच्या युगात तरुणाईकडून सोशल मीडियाचा अतिवापर होत असून ऑनलाइन मैत्रीचे प्रमाण वाढत आहे. त्यात अलीकडे डेटिंग अँपवरून मैत्री करण्याचे प्रमाण वाढत असताना त्याचा वापर लूटमार, फसवणूक करण्यासाठी होऊ लागला आहे. त्यामुळे डेटींग अँपवरील मैत्री धोक्याची ठरत असून गेल्या दोन वर्षांत अशा तक्रारींची संख्या झपाट्याने वाढली आहे.
पुण्यात नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने एकटे राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कुटुंबापासून दूर असल्यामुळे अनेकजण व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियातील लोकप्रिय अॅप्ससह टिंडर, स्पॅनचॅट, स्नॅक अशा ऑनलाइन डेटिंग अॅपचा सढळ वापर करत आहेत. डेटिंग अँपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींसोबत सुरुवातीला मैत्री आणि त्यानंतर शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातूनच अनेकांना लुटण्याचे, फसविण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. काही जणांना धमकावून पैसे उकळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. डेटिंग अँपवरून तरुणींना जाळ्यात ओढून लॉजवर भेटण्यासाठी बोलावून लुटणाऱ्या तरुणाला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती.
लोहगाव येथील एका आयटी इंजिनीअरला डेटिंग साइटवरून ओळख झालेल्या तरुणीने भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ३७ लाखांला फसविले होते. तर, काही दिवसांपूर्वीच अशाच अँपवरून ओळख झाल्यानंतर ‘एनसीएल’मधील एका संशोधकाचा खून झाल्याची गंभीर घटना उजेडात आली होती. अशा अँपच्या माध्यमातून व्हिडिओ, फोटो वापरून ब्लॅकमेल करणे, धमकी देणे, खंडणी मागण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे डेटिंग अँपवरील मैत्री धोक्याची ठरत असल्याने त्याबाबत अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे जाळ्यात अडकवून आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. पुण्यात डेटिंग अॅपद्वारे २०१९ मध्ये १०५ जणांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. तर, गेल्या वर्षी लॉकडाउनच्या वर्षातही अशा स्वरूपाच्या ८६ तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. डेटिंग अँपवरून फसवणूक करणाऱ्या टोळ्याच कार्यरत आहेत. अशा टोळ्या प्रामुख्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता येथील असल्याचे तपासात आढळून आले आहे.
नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधागिरी बाळगावी. विविध अॅपद्वारे तरुण-तरुणींना मैत्रीची भुरळ पाडली जात आहे. त्यांचा विश्वास संपादित करून आर्थिक फसवणूक, लूटमारही केली जात आहे. त्यामुळे खासगी, कौटुंबिक माहिती कोणालाही शेअर न करता सोशल मीडियावर व्यवहार करतानाही अधिक दक्षता बाळगावी.
- राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे