Advertisement

मृतदेहाचे किट उघडून नातेवाइकांनी काढले वृद्धेच्या अंगावरील दागिने

प्रजापत्र | Friday, 19/03/2021
बातमी शेअर करा

जळगाव-कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी अंगावरील दागिने काढण्यासाठी थेट मृतदेहाचे पीपीई किट उघडून कटरच्या साह्याने अंगावरील दागिने काढले. या प्रकारामुळे माणुसकी ओशाळल्याचा अनुभव उपस्थितांना आला. शहरातील एका ६५ वर्षीय वृद्धेचा गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला.

 

दुपारपर्यंत वृद्धेचे अनेक नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी घरी, रुग्णालयात पोहाेचले. दरम्यान, वृद्धेच्या अंगावर काही चांदीचे दागिने होते. शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांनी ही बाब तिच्या  कुटूंबातील , नातेवाइकांच्या लक्षात आणून  दिली; परंतु, आता वृद्धेचा मृत्यू झालेला असल्यामुळे तिच्या अंगावरील दागिने तिच्या सोबतच जाऊ द्या, असा निर्णय  कुटूंबातील काही सदस्यांनी घेतला. त्यानुसार काही वेळातच वृद्धेच्या मृतदेहावर पीपीई किट चढवला. त्यानंतर मृतदेह पूर्णपणे बंदिस्त करून नेरीनाका येथील स्मशानभूमीत नेण्यात आला.

 

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार सुरू होणार तेवढ्यात वृद्धेचा एक जवळचा नातेवाईक स्मशानभूमीत पोहोचला. त्याने वृद्धेच्या अंगावरील दागिन्यांच्या विषयावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपस्थितांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, या नातेवाइकाने थेट पीपीई किटमधून वृद्धेचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर कटर मागवून वृद्धेच्या अंगावरील दागिने कटरने ओरबाडून बाहेर काढले. सुमारे अर्धा तास हा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे संबंधित नातेवाईकाला अनेकांच्या संतापाचे शिकार बनावे लागले पण त्याने निगरगठ्ठपणे हा सर्व प्रकार सहन करून दागिने ताब्यात घेतले.

Advertisement

Advertisement