Advertisement

बीड जिल्ह्यात लसीचा तुटवडा !

प्रजापत्र | Friday, 19/03/2021
बातमी शेअर करा

बीड – देशातील 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि काही आजार असलेल्या तसेच 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींना कोरोना वरील लस देण्याच्या मोहिमेत बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी खंड पडला आहे .जिल्ह्यातील बीड जिल्हा रुग्णालयासह काही ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना रुग्णालयात खेटे मारावे लागत आहेत .गेल्या वर्षभरापासून जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी भारताने सर्वप्रथम लस उपलब्ध केली .सिरम आणि भारत बायोटेक ची लस 16 जानेवारी फ्रंट लाईन वर्कर ला देण्यास सुरुवात केली .त्यानंतर गेल्या महिनाभरापासून सर्वसामान्य नागरिक जे 45 वर्षेपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि त्यांना काही आजार आहेत अशा तसेच 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली .

 

बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालय आणि सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध करून दिली आहे,त्याचसोबत परळी,बीड माजलगाव येथील काही रुग्णलायत देखील लस उपलब्ध करून देण्यात आली आहे .जिल्ह्यात 68 सरकारी केंद्र आणि 10 खाजगी केंद्र याठिकाणी गेल्या काही दिवसात तब्बल 61 हजार लोकांना लस देण्यात आली आहे,यातील जवळपास 58 हजार लोकांनी सरकारी केंद्रावर लस घेतली आहे .जिल्ह्याला आतापर्यंत लसीचे 74 हजार डोस उपलब्ध झाले आहेत .

 

मात्र गुरुवारी दुपारपासून जिल्हा रुग्णालयात, माजलगाव आणि गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात तसेच काही खाजगी रुग्णालयात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे .बीड जिल्ह्याला लातूर येथून लसीचा पुरवठा होतो,मात्र तो वेळेत न झाल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावर येऊन पुन्हा परत जावे लागत आहे .

Advertisement

Advertisement