मुंबई-महाराष्ट्रातील कोरोनाचा संसर्ग वेगानं फोफावत चालला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून, दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. रुग्णवाढीचा हा वेग कायम राहिल्यास पुढील काही दिवसांमध्ये राज्यात दररोज २० हजारांपर्यंत रुग्ण आढळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या देशात आढळून येणाऱ्या प्रत्येक ५ रुग्णांपैकी ३ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.दरम्यान राज्यात २४ तासांत १६ रुग्णांची वाढ झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले.
निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर लोकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, मास्क वापराकडेही लोकांकडून काणाडोळा केला जात आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पुन्हा कोरोना संसर्गाने डोके वर काढले.