बीड-बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला आणि सोमवारी (दि.२२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असली तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने एक मोठा पेच कायम आहे. सेवा संस्था मतदारसंघात लेख परीक्षणाचा अ किंवा ब दर्जा असलेल्या संस्था अगदी बोटावर मोजण्या इतक्याच आहेत, त्यामुळे या ११ मतदारसंघात उमेदवार मिळणे देखील अवघड होणार आहे. याच विषयावर सोमवारी सहकारमंत्र्यांसमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या निर्णयावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.
बीड जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारी शेवटची तारीख आहे तर मंगळवारी छानणी होणार आहे. या १९ पैकी सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांचे भवितव्य सोमवारी सहकार मंत्र्यांसमोर होणाऱ्या सुनावणीत ठरणार आहे.
काय आहे अडचण
बीड जिल्हा बँकेच्या उपविधीप्रमाणे सेवा संस्था मतदारसंघातून ज्यांना निवडणूक लढवायची असेल त्या उमेदवाराच्या सेवा संस्थेला लेखापरीक्षणाचा अ किंवा ब दर्जा आवश्यक आहे. आजघडीला बीड जिल्हा बँकेच्या सभासद असलेल्या सेवासंस्थांची संख्या ७०० पेक्षा अधिक असली तरी जिल्ह्यातील अ किंवा ब दर्जा असलेल्या सेवासंस्थांची संख्या मात्र १० ते १३ च्या घरात आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात सेवा संस्था मतदारसंघात निवडणूक लढवायला पात्र उमेदवारच मिळणार नाहीत असे चित्र आहे. बँकेच्या उपविधीतील याच तरतुदीला स्थगिती द्यावी यासाठी बँकेचे संचालक भाऊसाहेब नाटकर यांनी सहकार मंत्र्यांकडे याचिका दाखल केली आहे. सहकार मंत्र्यांनी या तरतुदीला स्थगिती दिली तरच निवडणूक सोपी होईल अन्यथा अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळणार नाहीत. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र त्यावेळी तत्कालीन सहकार मंत्र्यांनी या तरतुदीला सिथगिती दिली होती.