बीड: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा घाटात शनिवारी (दि. ३१) एका पाठोपाठ एक अशा चार वाहनांची एकमेकांना धडक बसून भीषण साखळी अपघात झाला. कोळवाडीजवळ घडलेल्या या विचित्र दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य सहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा मोठा बोजवारा उडाला होता.
मांजरसुंबा घाटाची सुरुवात होण्यापूर्वी कोळवाडी गावाजवळ असलेल्या एका तीव्र चढणीवर पवनचक्कीचे अवजड साहित्य वाहून नेणारा एक मोठा ट्रक उभा होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने या उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर ही वाहने रस्त्यावरच अडकून पडली होती. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास याच अपघातग्रस्त वाहनांवर पाठीमागून आलेली एक पिकअप जीप आदळली. हा थरार इथेच थांबला नाही, तर काही वेळाने आणखी एक कार या वाहनांच्या ढिगाऱ्यावर येऊन धडकली. एकाच ठिकाणी लागोपाठ चार वाहने एकमेकांवर आदळल्याने महामार्गाची एक लेन पूर्णपणे बंद पडली.
या भयंकर दुर्घटनेत सुब्रमणी सेनगुंडन (वय ५०, रा. राजीव गांधी नगर, रीयल नगर, तामिळनाडू) आणि कंटेनरचा हेल्पर परवेज खान (वय २५, रा. गिरामसिया, जि. देवास, मध्य प्रदेश) यांना आपले प्राण गमवावे लागले. इतर सहा जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस आणि महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर सुरू होते. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर नोंद करण्यात आली आहे.
सोलापूर-धुळे महामार्गावरील कोळवाडी परिसरातील हा भाग आता अपघातांचा 'ब्लॅकस्पॉट' म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे. येथे सातत्याने होणाऱ्या जीवघेण्या अपघातांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या ठिकाणचा धोकादायक उतार कमी करण्यासाठी आणि तांत्रिक त्रुटी शोधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ तज्ज्ञ समितीची नियुक्ती करावी. तसेच, वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी येथे योग्य त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी संतप्त मागणी आता प्रवासी आणि नागरिकांमधून केली जात आहे.

