Advertisement

बीड : बीड जिल्ह्यात दहशत माजवणारे आणि वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर बीड पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या दणक्याने माजलगाव आणि आष्टी तालुक्यातील दोन सराईत गुंडांवर 'एमपीडीए' (MPDA) कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे. यापैकी एकाला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.  

 

तानाजी नगरचा अक्षय मेंडके हर्सूल कारागृहात

माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधीक्षकांमार्फत अक्षय नरेंद्र मेंडके (वय २८, रा. तानाजी नगर, माजलगाव) याच्याविरुद्ध MPDA प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मंजुरी दिली. अक्षय मेंडके याच्यावर तिर्रट जुगार खेळवणे, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे, दंगा करणे, दुखापत करणे, फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ यांसारखे तब्बल ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो जुमानत नव्हता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) त्याला ताब्यात घेऊन माजलगाव पोलिसांमार्फत स्थानबद्ध करण्यासाठी हर्सूल कारागृहात (छत्रपती संभाजीनगर) रवाना केले आहे.  

 

आष्टीच्या पप्पु दहिफळेवरही MPDA ची कारवाई

दुसऱ्या एका कारवाईत अंमळनेर पोलीस ठाण्याच्या (ता. आष्टी) सहायक पोलीस निरीक्षकांनी अजिनाथ ऊर्फ पप्पु बाबासाहेब ऊर्फ बाबुराव दहिफळे (वय २६, रा. महिंदा, ता. आष्टी) याच्याविरुद्ध धोकादायक व्यक्ती म्हणून MPDA प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावालाही जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. पप्पु दहिफळे याच्यावर खुनाचा प्रयत्न, विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ, घातक हत्याराने मारहाण असे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्यालाही स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  

ही महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक समीर शेख, उपविभागीय अधिकारी अशोक अनंत्रे आणि विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बंटेवाड, धनंजय ढोणे, सपोनि सतीश कोटकर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. 

 

अवैध धंदेवाल्यांना एसपींचा थेट इशारा

भविष्यातही वाळूचा चोरटा व्यापार करणारे, गुटखा विक्रेते, धार्मिक तेढ निर्माण करणारे समाजकंटक, दादागिरी करणारे गुंड आणि अवैध जुगार, लॉटरी व हातभट्टी दारूचा व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही जास्तीत जास्त MPDA आणि MCOCA (मोक्का) कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.  

Advertisement

Advertisement