बीड: बीड जिल्ह्यामध्ये घरफोडी आणि वाहनचोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील एका सराईत आंतरजिल्हा टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी अत्यंत शिताफीने गेवराई बायपास येथे सापळा रचून चार आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे घरफोडीचे तीन आणि वाहनचोरीचा एक असे एकूण चार गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा (गु.र.नं. ४४१/२०२६) समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि नेकनूर पोलीस करत होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये दिसणाऱ्या चार संशयितांच्या पेहरावावरून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढली.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने उलगडला गुन्ह्याचा गुंता
मिळालेल्या माहितीनुसार, हे चोरटे १) बालसिंग अमलरसिंग टाक (वय ३०), २) नानकसिंग मगबलसिंग बावरी (वय २२), ३) अरुणसिंग जगतापसिंग बावरी (वय २०, तिघेही रा. संभाजीनगर, तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना) आणि ४) इरफान बनिमिया सय्यद (वय २०, रा. रुई, ता. अंबड, जि. जालना) असल्याचे निष्पन्न झाले.
गेवराई बायपासवर टीयूव्ही गाडी अडवली
हे सर्व चोरटे इरफान सय्यद याच्या लाल-काळ्या रंगाच्या टीयूव्ही (TUV) गाडीने जालना-गेवराई मार्गे बीडकडे येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने ३० ऑक्टोबर रोजी गेवराई बायपास येथे सापळा रचला. संशयित गाडी येताच पोलिसांनी ती अडवून चारही आरोपींना ताब्यात घेतले.
चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हे उघड
आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालत नेकनूर, धारूर आणि दिंद्रूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घरफोडी, तर केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली गाडी व चोरीचा असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील सखोल तपासासाठी चारही आरोपींना नेकनूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार बप्पासाहेब घोडके, जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गित्ते, गणेश मराडे आणि विकी सुरवसे यांच्या पथकाने पार पाडली.

