Advertisement

१००% इथेनॉल इंधनाला केंद्राची मंजुरी

प्रजापत्र | Monday, 26/10/2026
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : देशात लवकरच पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी ऐवजी १००% इथेनॉलवर (E100) चालणाऱ्या गाड्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. केंद्र सरकारने नुकतीच वाहनांसाठी E100 इंधनाच्या वापराला अधिकृत मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अशा नवीन गाड्यांच्या चाचण्या आणि त्या रस्त्यावर उतरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे देशातील प्रदूषण कमी होण्यासोबतच कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्वही लक्षणीयरीत्या घटणार आहे.

 

केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करत सरकारने उत्सर्जन मानकांमध्ये E85 सोबत E100 चा समावेश केला आहे. E100 हे शंभर टक्के शुद्ध जैवइंधन (बायोफ्युएल) असून ते ऊस आणि मक्यासारख्या जैविक स्रोतांपासून तयार केले जाते, ज्यामध्ये पेट्रोलचा अजिबात अंश नसतो. फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानामुळे एकाच इंधन टाकीत इथेनॉल आणि पेट्रोलच्या वेगवेगळ्या मिश्रणावर (E85 ते E100) गाडी विनाअडथळा चालवणे शक्य होणार आहे.

 

या नव्या निर्णयाचा सध्याच्या वाहनधारकांवर कोणताही परिणाम होणार नाही. सध्याच्या पेट्रोल किंवा E20 पेट्रोलवर चालणाऱ्या इंजिन असलेल्या गाड्यांमध्ये हे उच्च क्षमतेचे इंधन वापरता येणार नाही. त्यासाठी कार उत्पादक कंपन्यांनी (OEMs) खास १००% इथेनॉल इंधनासाठी डिझाइन आणि प्रमाणित केलेल्या नवीन गाड्याच ग्राहकांना खरेदी कराव्या लागतील. तसेच, सामान्य पेट्रोल गाड्या सक्तीने बंद केल्या जाणार नसून, इथेनॉल हा ग्राहकांसाठी केवळ एक नवीन आणि पर्यावरणास अनुकूल असा ऐच्छिक पर्याय असणार आहे.

 

सरकारच्या या निर्णयामुळे देशाचे प्रामुख्याने दोन मोठे फायदे होणार आहेत. पारंपरिक इंधनाच्या तुलनेत इथेनॉलमुळे कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बनसारख्या विषारी वायूंचे उत्सर्जन कमी होऊन प्रदूषणाला मोठा आळा बसेल. तसेच, भारताला कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते, परंतु इथेनॉलचा वापर वाढल्यास कच्च्या तेलाची आयात कमी होईल आणि पर्यायाने देशाच्या परकीय चलनाची मोठी बचत होईल.

Advertisement

Advertisement