मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ५०० कोटी रुपयांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या ऑडिओ क्लिपमागील खरे सत्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेसमोर आणतील, अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्याचवेळी ही क्लिप पूर्णपणे खोटी आणि बनावट असल्याचे भासवण्यासाठी पडद्यामागे आणखी एक नवीन कट शिजत असल्याची गुप्त माहिती आपल्याला मिळाली असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
राजकीय नेत्यांवर सडकून टीका करताना जरांगे म्हणाले की, केवळ सत्तेत टिकून राहण्याच्या स्वार्थापोटी आता हे नेते एकमेकांचे गुन्हे लपवत आहेत. सत्य समोर आल्याने त्यांच्या जिव्हारी लागले आहे, म्हणून काय आम्ही त्यांच्यावर आरोप करणे सोडून द्यायचे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. "मराठा समाजाला वाऱ्यावर सोडून तुम्ही केवळ सत्तेसाठी आणि मैत्रीसाठी एकत्र येत आहात, ही महाराष्ट्राची अत्यंत मोठी शोकांतिका आहे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
'एआय'च्या दाव्याचे खंडन आणि फडणवीसांना थेट सवाल
काही दिवसांपूर्वी जरांगे यांनीच ही क्लिप उघड केली होती. त्यानंतर भाजपकडून ही क्लिप 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या (AI) मदतीने बनवली असून, यामागे संजय राऊत यांचा हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, जरांगे पाटील यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाशी संजय राऊत किंवा प्रसाद लाड यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांनी विचारले की, "जर फडणवीस या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालत असतील, तर या सगळ्यामागे त्यांचाच हात होता का, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे."
सत्य दाबण्याचा प्रयत्न उधळून लावणार
या ऑडिओ क्लिपमुळे सुरुवातीला नेत्यांमध्ये मोठी शाब्दिक चकमक आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. परंतु, आता तिसऱ्यालाच याचा राजकीय फायदा नको म्हणून आपापसांतील वाद मिटवण्याची भाषा केली जात आहे. यावरूनच ही क्लिप शंभर टक्के खरी असल्याचे आणि आता सर्वजण मिळून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद जरांगे यांनी केला. "आमचे आंदोलन मोडून काढण्याचा आणि आमची बदनामी करण्याचा कितीही प्रयत्न झाला, आणि सत्तेसाठी तुम्ही सत्य दाबण्याचा कितीही खटाटोप केला, तरी मी अजिबात शांत बसणार नाही. या प्रकरणातील सत्य मी जनतेसमोर आणतच राहणार," असा ठाम इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.'

