Advertisement

दिवाळीच्या तोंडावर FDA ची मोठी कारवाई

प्रजापत्र | Sunday, 25/10/2026
बातमी शेअर करा

सध्या राज्यात दिवाळीची लगबग सुरू असून, सणासुदीच्या काळात नफा कमावण्यासाठी भेसळयुक्त अन्नाची विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात एक व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल १६.९२ कोटी रुपये किमतीचे संशयास्पद आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांची गय केली जाणार नाही हे स्पष्ट करत, प्रशासनाने ६८ आस्थापनांचे परवाने रद्द केले आहेत. याशिवाय, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७ उत्पादन केंद्रांना कायमचे सील ठोकण्यात आले आहे.

 

अनेकांवर गुन्हे दाखल आणि २० जणांना अटक

दिवाळीत प्रामुख्याने खवा, मिठाई, सुकामेवा, खाद्यतेल आणि तयार फराळाला मोठी मागणी असते. हीच बाब हेरून मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा सहा प्रमुख विभागांमध्ये एफडीएने तपासणीचे जाळे विणले. या धडक कारवाईत मुदत संपलेले आणि आरोग्यास अपायकारक असणारे तब्बल ८,३९२ किलो अन्नपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा मानकांचे पालन न केल्याच्या ठपक्याखाली राज्यभरात २२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, २० आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक कारवाई

यापूर्वी पार पडलेल्या नवरात्रोत्सवादरम्यानही एफडीएने तब्बल ९.११ कोटी रुपयांचा संशयास्पद माल पकडला होता. याव्यतिरिक्त, राज्यात बंदी असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाला यांच्या बेकायदा विक्रीवरही छापा टाकून ३.१५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण राज्यव्यापी कारवाईत छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वात मोठी, म्हणजेच ४.१९ कोटी रुपयांची विक्रमी जप्ती करण्यात आली आहे. निकृष्ट दर्जाचा किंवा फेकून दिलेला माल पुन्हा विक्रीसाठी आणल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे.

 

सोलापूरजवळ हजारो किलो भेसळयुक्त खवा नष्ट

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या एफडीए पथकाने पुणे-पंढरपूर महामार्गावर माळशिरस परिसरात एका संशयित वाहनावर (MH 25 AJ 4023) कारवाई केली. या वाहनामधून धाराशिव जिल्ह्यातील तीन उत्पादकांनी बनवलेला १,३३७ किलो खवा साताऱ्यातील घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना पाठवला जात होता. अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून या नाशवंत खव्याची वाहतूक केली जात होती. यामध्ये भेसळ असल्याचा दाट संशय आल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ सुमारे ४.८१ लाख रुपये किमतीचा हा संपूर्ण खवा खड्ड्यात पुरून नष्ट केला.

 

सणासुदीच्या काळात प्रशासनाची करडी नजर

दिवाळीची खरेदी आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याने, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी एफडीएची ही विशेष शोधमोहीम अविरत चालू राहणार आहे. बाजारात विकले जाणारे गोडेतेल, मावा, खवा, दुग्धजन्य पदार्थ आणि तयार फराळ यांच्या दर्जाची बारकाईने तपासणी केली जात आहे. जे व्यापारी लोकांच्या जिवाशी खेळतील आणि नियमांची पायमल्ली करतील, त्यांचे परवाने निलंबित करण्यासोबतच दुकाने सील करून थेट कायदेशीर खटले भरले जातील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement